पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची सुटका, आज इस्लामाबाद हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश

0

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अखेर सुटका करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदा ठरवली असून तातडीने सोडण्याचे आदेश दिलेत. या निकालामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. मंगळवारी इम्रान खान यांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोठडीत आपल्याला एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे वागणूक दिली, लाठ्या काठ्याने मारहाण केली, असे आरोप त्यांनी कोर्टात केले. आज सकाळी 11.30 वाजता इस्लामाबाद हायकोर्टात हजर राहणार आहेत.

इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. इम्रान खान यांच्यावर अनेक भ्रष्टाचार, आर्थिक हेराफेरी, दहशतवाद, दंगली भडकवणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पीटीआय सरकारच्या काळात अल कादिर ट्रस्टला काही प्रकरणात इम्रान खान यांनी मदत केली. या मदतीमुळे अल कादिर ट्रस्टला फायदा झाला पण सरकारचा लाखो रूपयांचा महसूल बुडाला. अल कादिर युनिव्हर्सिटीसाठी परवानगी देण्याच्या बदल्यात इम्रान खान यांना मोठया प्रमाणात जमीन देण्यात आली. या प्रकरणात इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांनाही आरोपी करण्यात आले.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इम्रान खान यांचं सरकार विश्वासदर्शक ठराव हरलं आणि पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाला. एकीकडे नव्या सरकारच्या काळात इम्रान खान यांच्यावर रोज नवनवे आरोप आणि खटले दाखल व्हायला लागले. दुसरीकडे इम्रान खान हे पाकिस्तानमध्ये एकामागोमाग एक रॅलीज काढायला लागले. त्यामुळे इम्रान खान यांच्या रॅलीजना मिळणारा प्रतिसाद वाढत गेला आणि त्यापाठोपाठ कारवायांचा ससेमिराही मागे लावला आहे. क्रिकेटचे मैदान गाजवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे 70 वर्षांचे आहेत

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) मुख्य न्यायधीशांनी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर एनएबीला चांगलेच फटकारले होते. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. सरन्यायाधीश म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरातून कशी काय अटक केली जाऊ शकते? न्यायालयाची एक प्रतिष्ठा असते.

इम्रान खान यांना अटक (Imran Khan Arrest) करण्याचा याआधीही प्रयत्न झाला होता. पण इम्नान खान यांच्या समर्थकांनी त्याला प्रचंड विरोध केला. इम्रान खान यांच्या अटकेनंतर मोठा गोंधळ झाला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काही भागांमध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सध्या पाकिस्तामध्ये शांततेचे वातावरण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here