रत्नागिरी : पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी आणि मराठी भाषांमधील चरित्रांचे प्रकाशन येत्या २८ मे रोजी होत आहे.
राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेले मराठी कीर चरित्र २०११ साली प्रसिद्ध झाले होते.
आता त्याची सुधारित आवृत्ती तयार झाली आहे. मसुरकर यांनीच त्यांचे इंग्रजी चरित्र लिहिले आहे. हे चरित्र मूळ मराठी चरित्राचे भाषांतर नसून पूर्णतः स्वतंत्रपणे केलेले लेखन आहे. धनंजय कीर यांच्या १२ मे या ३८ व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मसुरकर यांनी ही घोषणा केली. त्यांच्या जयंतीनिमित्त २३ एप्रिल रोजी सुरू केलेल्या ‘प्रकाशनपूर्व सवलतीच्या दरातील नोंदणी’ला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.
स्वा. सावरकर यांच्या इंग्रजी चरित्रापासून प्रारंभ करून रत्नागिरी शहराचे सुपुत्र धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी आणि लोकहितकर्ते बाबासाहेब बोले यांची इंग्रजी व मराठी चरित्रे लिहिली. त्यांनी १९५० ते १९७८ या काळात लिहिलेल्या या चरित्रांना आजही मागणी असते. बोले चरित्राखेरीज अन्य चरित्रांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. लोकमान्य टिळक चरित्राचे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेले भाषांतर २०१४ मध्ये प्रकाशित झाले. भक्कम पुराव्यांवर आधारित माहितीने परिपूर्ण असल्याने धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्रे इतिहास आणि व्यक्तिचरित्रांच्या संशोधन कार्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह मानली जातात.
चरित्र लेखन कसे करावे याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून चरित्र लिहिण्याच्या धनंजय कीर यांच्या पद्धतीने प्रभावित होऊन आपण १९९६ मध्ये त्यांच्या चरित्राचे लेखन करण्याचे ठरविले, असे मसुरकर यांनी सांगितले. त्यांच्या जीवनाचा आणि विशेषतः त्यांच्या चरित्रांचा सखोल अभ्यास करून त्यांनी लिहिलेले मराठी चरित्र २८ मे २०११ रोजी प्रकाशित झाले. त्याच्या २१६ प्रती शासनाने खरेदी केल्या आणि वाचकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. जवळजवळ सर्व प्रती दोनच वर्षांत संपल्या, उरलेली एकच प्रत श्री. जोशी या गुजरातमध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ मराठी व्यक्तीने खरेदी केली. गेली अनेक वर्षे या पुस्तकाबद्दल मागणी होती, दरम्यानच्या काळात नवी माहितीही प्राप्त झाल्याने हे मराठी चरित्र पुन्हा बाजारात आणण्याचे ठरविले, असे श्री. मसुरकर म्हणाले. पहिल्या आवृत्तीत दोनशे पृष्ठे आणि वीस प्रकरणे होती तर सुधारित आवृत्तीमध्ये एकवीस प्रकरणे असतील. शंभर पानांचे इंग्रजी चरित्र सर्वस्वी निराळे असून त्यात तेरा प्रकरणे आहेत.
सर्वसामान्य चाहत्यांसाठी मराठी चरित्राची किंमत पूर्वीप्रमाणे अडीचशे रुपये आहे. इंग्रजी पुस्तकाची किंमत दीडशे रुपये आहे. दोन्ही पुस्तकांना प्रकाशनापूर्वी प्रत्येकी पन्नास रुपये सवलत ठेवण्यात आली आहे. पुस्तकाबद्दल अधिक माहितीसाठी ९९६०२४५६०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
‘अवेश्री प्रकाशना’तर्फे छापील स्वरूपात तयार होत असलेली ही पुस्तके ई-बुक स्वरूपातही प्रकाशित होणार असून, ‘सत्त्वश्री प्रकाशना’तर्फे (कोकण मीडिया) ई-बुक्सचे प्रकाशन केले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 12-05-2023
