◼️ ६० वर्षांवरील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी : सध्या राज्यामध्ये कोव्हिड – १९ आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता शासनाने नाकावाटे घ्यावयाची लस उपलब्ध केलेली आहे.
कोव्हिड १९ लसीकरण कार्यक्रमामध्ये नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीचा वापर सुरू करण्याबात मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून, इन्कोव्हॅक लसीचा साठादेखील रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत फक्त ६० वर्षांवरील नागरिकांच्या प्रिकॉशन डोससाठीच इन्कोव्हॅक लस वापरण्यात यावी, अशा सूचना राज्यस्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ६० वर्षांवरील ज्या नागरिकांचा दुसरा डोस कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन घेऊन सहा महिने पूर्ण झालेले आहेत असे लाभार्थीच इन्कोव्हॅक लसीच्या प्रिकॉशन डोससाठी पात्र असतील. ६० वर्षांवरील नागरिकांनी आपल्या तालुक्यात लसीकरण सत्रांच्या ठिकाणी हे प्रिकॉशन डोस घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी केले आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील पुढील संस्थाना लसीकरण सत्रांच्या ठिकाणी इन्कोव्हॅक लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय रत्नागिरी ५०, ग्रामीण रुग्णालय लांजा २०, ग्रामीण रुग्णालय राजापूर ३०, नागरी आरोग्य केंद्र चिपळूण ५०, ग्रामीण रुग्णालय गुहागर १०, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर २०, ग्रामीण रुग्णालय देवरुख ३०, उपजिल्हा रुग्णालय दापोली ४०, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी ४०, नगर परिषद दवाखाना खेड १०, ग्रामीण रुग्णालय मंडणगड १० असे एकूण ३१० डोस उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 12-05-2023