देवरूख : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रयोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देदिप्यमान यश मिळविले आहे. बुके येथे झालेल्या फॉर्म्युला स्टुडण्ट २०१९ या स्पर्धेत टीम एमएच ०८ रेसिंग कारने एकूण बक्षिसे पटकावली. महाविद्यालयाच्या विविध शाखेतील बारा सदस्यीय टीमने जागतिक स्तरावर महाविद्यालयासह देशाची मान उंचावली आहे. इंग्लंड येथे झालेल्या जगातील सर्वात प्रतिष्ठीत अशा स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या या टीमची निवड झाली होती. जगभरातील विविध विद्यापीठातील तब्बल ८१ टीम या स्पर्धेत उतरल्या होत्या, ज्यामध्ये ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठाच्या टीमचा समावेश होता. सन १९९८ पासून कार्यरत असणाऱ्या आय मेक फॉर्म्युला स्टूडंट या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारा आयोजित करण्यात आलेल्या फॉर्म्युला स्टूडंट इव्हेंटमध्ये दरवर्षी शेकडो दिग्गज आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सहभागी होतात. ही स्पर्धा फॉर्म्युला १ दुनियेमधील बहुचर्चित असणाऱ्या सिल्वरस्टोन सर्किट, युके येथे घेतली जाते. या स्पर्धेत निवड होण्यासाठी विशेष चाचण्या घेतल्या जातात. या चाचणीमध्ये कमालीचे यश मिळवत या टीमने भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त केली होती. जुलै २०१९ मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानंतर सर्व स्पर्धकांना यातील नियम समजावण्यात आले. यानंतर स्पर्धेची अतिशय कठीण समजली जाणारी तांत्रिक चाचणी टीमने यशस्वीरित्या पर करून आपली पात्रता सिद्ध केली. याप्रसंगी कारचे डिझाईन, कॉस्ट, बिझनेस प्लान यासारख्या इव्हेंटमध्ये विद्याथ्यांनी सादरीकरण केले. या आधारे टीमला बिझनेस प्लान प्रेझेंटेशनमध्ये ३२वा, डिझाईनमध्ये ३६ वा, तसेच कॉस्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग इवेंटमध्ये ५५ वा रैक मिळाले तर सर्व ८१ टीममध्ये जागतिक स्तरावर ४३ वा क्रमांक घोषित करण्यात आला. टीमचा कसान प्रणीत वाटवे याने केलेले उत्तम सादरीकरण, तसेच त्याचे व्यवस्थापन कौशल्य पाहन परीक्षकांनी विशेष कौतुक केले व स्पर्धेतील अतिशय प्रतिष्ठेचा क्रेग डावसन पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. कोकणातील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग ४ वर्षापासून अति उच्च क्षमतेच्या फॉर्म्युला स्टुडंट रेस कारची निर्मिती करीत आहेत. संस्थेचे संस्थापक रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्ष नेहा माने, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. महेश भागवत, प्राध्यापक आणि विद्याथ्यांनी या टीमचे स्वागत करून अभिनंदन केले.
