मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील सरकारला नवसंजीवनी मिळाली आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यावर कोर्टाच्या निर्णयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच विस्तार होईल असं उत्तर दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार स्थिर असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार करणे शिंदे-फडणवीस यांच्यासमोरील आव्हान असणार आहे. सध्या कॅबिनेटमध्ये २० मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात आणखी २३ जणांना संधी मिळू शकते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ३० जून २०२२ रोजी घेतली होती. त्यानंतर ४० दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यात १८ जणांचा समावेश करण्यात आला होता.
राज्यमंत्रिमंडळात ४३ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. त्यामुळे २३ नव्या मंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यात शपथ दिली जाऊ शकते. शिंदेंसोबत गेलेल्या ५० आमदारांपैकी ९ जणांना पहिल्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. माहितीनुसार एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतच्या १४ जणांना मंत्रिपदाची संधी देऊ शकतात. तर भाजपामध्ये मंत्रिपदासाठी अनेक उत्सुक आहेत. परंतु इच्छुक नेते आणि भाजपाचे वरिष्ठ नेते यांच्यात बैठका होतील. त्यानंतर दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल.
सध्याच्या मंत्रिमंडळात एकही अपक्ष आमदार नाही ज्यांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत महिला नेत्याचाही समावेश नाही. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला सातत्याने लक्ष्य केले. परंतु सुप्रीम कोर्टात सरकारच्या भवितव्याचा निर्णय प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. आता कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 12-05-2023
