विधानसभा अध्यक्षांनी एवढ्या दिवसांत निर्णय घ्यावा : संजय राऊत

0

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या जबाबदारीची आठवण राहुल नार्वेकर यांना करुन दिली.

तसेच, विद्यमान सरकार हे बेकायदेशीर असून अध्यक्षांची निवडही बेकायदेशीरच ठरेल, असे म्हटले आहे. त्यानंतर, आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही विधानसभा अध्यक्षांना लक्ष्य केले असून लवकरात लवकर म्हणजे किती दिवसांत अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, याची डेडलाईनच सांगितली. तसेच, शिंदे-फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही सडकून टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले. या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. भरत गोगावले यांची प्रतोदपदी नेमणूक बेकायदेशीर आहे, यावरून सगळा काही पिक्चर क्लिअर आहे. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य आहे हे सिध्द झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. घोषित झालेल्या निकालावरून सरकार जाणार असून न्यायालयाने जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोपवल्याचे टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच, पुढील ९० दिवसांत अध्यक्षांना यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे, हे सरकार केवळ ९० दिवसांचं आहे, तीन महिन्यात हे सरकार कोसळेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

शिवसेना नेते व माजी आमदार अनिल कदम यांच्या वडिलांचे निधन झाल्याने राऊत यांनी आज सकाळी ओझर येथे कदम कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. राऊत म्हणाले, न्या.धनंजय चंद्रचूड यांचे वडील देखील त्यावेळी न्यायमूर्ती असताना त्यांनी इंदिरा गांधी सरकारला देखील धक्का दिला होता. त्यामुळे केजरीवाल यांना देखील असेच दिल्लीचे नायब राज्यपाल काम करू देत नसल्याने तो निकाल दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या बाजूने गुरुवारी लागला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना काम करणे सोपे होणार आहे. आताचे राज्य सरकार हे बेकायदेशीर असून स्वतः गोगावले यांची बेकायदेशीर नेमणूक झाल्याने शिंदे हे सुध्दा नियमबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा आमच्या बाजूने असल्याचे राऊत यांनी म्हटले.

शिंदे-फडणवीसांनी पत्रकार परिषद घेणे म्हणजे निर्लज्जपणा आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे कपडे फाडले आहेत, त्यांना उघडं केलंय. मात्र, चुकीची माहिती देण्याचं काम शिंदे-फडणवी हे पत्रकार परिषद घेऊन करत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. केंद्राचे दडपण जास्त दिवस चालणार नाही. पुढील ३ महिन्यात हे सरकार कोसळणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. जनता आमच्या बाजूने भक्कम उभी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here