अखेर दिल्ली पोलिसांसमोर बृजभूषण सिंह हजर, जबाब नोंदवला आरोप मात्र फेटाळले

0

नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीपटूंनी (wrestlers) भाजपाचे आमदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष
बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sigh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह हे दिल्ली पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांनी पोलिसांकडे त्यांचा जबाब नोंदवला असून त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडे काही कागदपत्र देखील मागितली आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा गरज पडल्यास त्यांना पोलिसांत हजर रहावे लागणार आहे.

एसआयटी समोर नोंदवला जबाब

बृजभूषण शरण सिंह यांनी दिल्ली पोलिसांच्या एसआयटी पथकासमोर त्यांचा जबाब नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी सहा सदस्यांची एसआयटी समित गठित केली आहे.

बृजभूषण यांच्याबरोबर भारतीय कुस्ती संघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. महिला कुस्तीपटूंनी विनोद तोमर यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत.

बृजभूषण यांच्यावर काय आरोप आहेत?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितांमध्ये एक अल्पवयीन मुलगी देखील आहे, ज्यांच्या प्रकरणी बृजभूषण यांच्या विरोधात बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृजभूषण शरण यांच्याविरोधात पोलीसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी कुस्तीपटूंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले होते.

कुस्तीपटूंकडून काळा दिवस

जतंर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला कुस्तीपटू भाजपा आमदारांच्या विरोधात काळा दिवस म्हणून साजरा केला आहे. कुस्तीपटूंच्या विरोधाची ही पद्धत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सोशल मिडीयावर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बऱ्याच प्रतिक्रिया देखील येत आहेत. तसेच कुस्तीपटूंच्या भूमिकेबद्दल देखील लोकं आपली मतं मांडताना दिसत आहेत. तर काही लोकं या आंदोलनाच्या आणि ‘काळा दिवस’ साजरा करण्याच्या भूमिकेविरुद्ध देखील प्रतिक्रिया देत आहेत.

23 एप्रिलपासून कुस्तीपटूंचे आंदोलन

बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here