रत्नागिरी : जिल्ह्यात 42 गावातील 85 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून आतापर्यंत 17 हजार 45 लोकांनी याचा लाभ घेतला आहे. उन्हाची काहीली मागील आठवड्यात अधिक जाणवत असल्यामुळे पाणीटंचाईची तिव्रतेस वाढ झाली आहे. प्रशासनाकडून पाण्याची वापर काळजीपुर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर तालुके वगळता अन्य सहा तालुक्यांमधील टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट गावांना पाणी पुरवठा करण्यावर भर दिला गेल्यामुळे यावर्षी टंचाईतील गावांमध्ये घट होत आहे. यावर्षीचा टंचाई आराखडाही कमी करण्यात आला आहे. टँकरवरील खर्चात भविष्यात मोठी कपात अपेक्षित आहे. यंदा मार्चच्या महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात टंचाई जाणवण्यास सुरवात झाली. गावाच्या एका बाजूला डोंगरात वसलेल्या गावांमध्ये टंचाईची परिस्थिती जाणवत अहे. सर्वाधिक टँकरची मागणी खेड तालुक्यातुन आहे. उन्हाचा कडाका आणखीन काही दिवस राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वी रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर थोडावेळ हवेत गारवा होता; परंतू दुपारनंतर उष्मा जाणवू लागला. वाढत्या उन्हामुळे पाणीपातळीत घट होत असून अजुन काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे.
जिल्ह्यातील लघुपाटबंधार्यांमध्ये 35 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. याचा विचार करताना नदी किनारी भागातील विहिरींचे पाणीही कमी होणार आहे. यावर्षी पाऊस उशिराने सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसे झाले तर मे महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्येत मोठी वाढ होऊ शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 12-05-2023