खरीप हंगामाकरिता भातपिकासाठी दीड कोटीचे अऩुदान

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील ६६ हजार हेक्टर क्षेत्र भातपीक लागवडीचे आहे. या क्षेत्रामध्ये भाताची लागवड करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना भातपिकाचे मोफत बियाणे पुरविण्यात येईल.

त्याकरिता एक कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी-बियाणे योग्य वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करावे. जिल्ह्यात आंबा, काजू, भात या पिकांसह नाचणी, हळद यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने आंबा फळावरील रोगनिवारणासाठी संशोधन करावे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोकण कृषी विद्यापीठाने प्रशिक्षण केंद्र तयार करून त्यामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. शासनामार्फत जास्तीत जास्त भातखरेदी करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी भातपीक लागवडीसाठी प्रोत्साहित होतील. कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात काजू बागायतदारांचा मेळावा आयोजित करावा, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.

जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे यांनी जिल्ह्यातील पिकांची लागवड, फळपीक उत्पादन, पर्जन्यमान तपशील, प्रमुख पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता, फळबाग लागवड, सिंचन याबाबतची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्ह्यात आयोजित झालेल्या उपक्रमांची माहिती कुऱ्हाडे यांनी यावेळी दिली.

बैठकीला आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत, भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राचे कृषीविद्यावेत्ता डॉ. के. व्ही. मालशे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here