रत्नागिरी : मुसधार पावसामुळे गेली दोन वर्ष पावसाळ्याच्या कालावधीत वारंवार ठप्प होणारा आंबा घाट यावर्षी पावसाळ्यासाठी सज्ज झाला असून, कोसळणारे धोकादायक भाग कापणे, गटारे मोकळी करण्यात आली आहेत. यावर्षी कोल्हापूरला जाणाऱ्यांसाठी त्यांचा प्रवास पावसाळ्यातही सुखकर होण्यासाठी बांधाकाम विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
महामार्ग प्राधिकरणच्या कोल्हापूर विभागाच्या निरीक्षणाखाली घाटातील दुरुस्तीचे काम सुरू असून, तीन चार दिवसात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यामुळे रस्त्याचा भाग खचल्यामुळे काही काळ रस्ता बंद झाल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. दोन वर्षात झालेल्या घटनांची पुनरावृती होऊ नये यासाठी महामार्ग प्राधिकारण कोल्हापूर यांनी यावर्षी पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना केल्या आहेत.
आंबा घाटात ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे. अशा ठिकाणच्या दरडी काढण्यात आल्या आहेत. ज्या भागात रस्ता खचत आहे. तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारण्याचे काम गतवर्षीच हाती घेण्यात आले होते. ते काम यावर्षी पूर्ण झाले असून येथील जमीन खचण्याचा धोका कमी झाला आहे. डोंगरमाथ्यावरुन येणारे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातून नैसर्गिक पद्धतीने वाहून जाण्यासाठी स्वतंत्र गटारे बांधण्यात आली आहेत. काही ठिकाणी नवीन गटारे बांधण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी तीव्र उतारावर वाहने रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे. अशा भागात बॅरकेटिंग बसविण्याचे काम सुरू असून येत्या तीन ते चार दिवसात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:52 12-05-2023
