◼️ पोलिस बंदोबस्त हटवला
रत्नागिरी : गेल्या १५ दिवसांपासून बारसू रिफायनरी माती परीक्षण सर्वेक्षण सुरू होते. अखेर ११ मे रोजी हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, दि. १२ पासून या ठिकाणी कामकाजाची यंत्रणा थंडावली आहे. माती परीक्षणासाठी जे काही खड्डे खोदायचे होते, ते काम पूर्णत्वाला गेल्याने काम थांबवण्यात आले आहे.
पोलिस यंत्रणा आता या ठिकाणी नाही. इतर जिल्ह्यातून आलेली अतिरिक्त पोलिस कुमक त्या त्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
राजापूर तालुक्यात बारसू येथील माती परीक्षण कामात सुरुवातीला स्थानिकांनी विरोध केला. मात्र हे माती परिक्षणाचे काम सुरू असल्याचे जनजागृती करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सहकार्य केल्याने हे काम लवकर पूर्णत्वाला गेले. माती परीक्षणाचा अहवाल आल्यावरच हा प्रकल्प होईल की नाही, याचा निर्णय होईल, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील स्पष्ट केले होते. त्यानुसार ही पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये पोलिस दलाने २४ तास अलर्ट राहून आपली भूमिका चोखपणे पार पाडली.
त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, स्थानिक आणि पोलिस यंत्रणा यांच्यात सुरुवातीला वाद झाले होते. मात्र, पोलिसांनी ही परिस्थिती संयमाने हाताळली.
माती परीक्षणादरम्यान काही नागरिकांनी पोलिसांची बदनामीही करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शेवटपर्यंत संयम सोडला नाही. परिणामी दि. ११ मे रोजी हे परिक्षणाचे काम पूर्णत्वाला गेले आहे. हजारो पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 13-05-2023