रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह रंगणार आहे.
वीरभूमी परिक्रमेअंतर्गत हा सोहळा येत्या २१ ते २८ मे दरम्यान होणार आहे. वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प यांसह विनायका रे हा संगीतमय कार्यक्रम, शोभायात्रा आणि सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी शहरात करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांकरिता पतितपावन मंदिर संस्था, भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विठ्ठल मंदिर देवस्थान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे सहकार्य लाभत आहे. नियोजनाकरिता समितीही गठित करण्यात आली आहे.
या सप्ताहाची सुरवात २१ मे रोजी सकाळी ९ वाजता स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅलीने करण्यात येणार आहे. यात शेकडो बाईकस्वार सहभागी होतील. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये त्या तिघी (स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा) हे सावरकर कुटुंबातील महिलांच्या त्यागाचे मूर्तीमंत प्रतिक दाखवणारे नाट्य सादर होईल. पुण्यातील अभिव्यक्त संस्थेतर्फे याचे सादरीकरण होणार आहे. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन पतितपावन मंदिरात सुरू होईल. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता आठवडा बाजार व नंतर स्वा. सावरकर चौक येथे देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी वीर सावरकरांवर आधारित पथनाट्य सादर करतील. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठल मंदिर येथे वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.
गुरुवारी (ता. २५) रेल्वेस्टेशन आणि मारुती मंदिर चौक येथे पथनाट्य सादर केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांचे कीर्तन साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड येथील ओम साई मित्रमंडळाच्या हॉलमध्ये होणार आहे. स्वा. सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार यावर कीर्तनकार आफळे विवेचन करणार आहेत. २६ मे रोजी वाळूशिल्प भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर शिल्पकार अमित पेडणेकर साकारणार आहेत. सायंकाळी ६ वाजता त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. सप्ताहात असे विविध कार्यक्रम होत असताना स्वा. सावरकरांच्या गीते, कवितांवर आधारित विनायका रे… हा संगीतमय कार्यक्रम २७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात (वातानुकूलित) रंगणार आहे. लिटिल चॅंप फेम आणि रत्नागिरीचा सुपुत्र गायक प्रथमेश लघाटे व आघाडीची गायिका मुग्धा वैशंपायन वीर सावरकरांचे गीते सादर करणार आहेत.
वीर सावरकरांची १४० वी जयंती येत्या २८ मे रोजी आहे. या जयंतीचे औचित्य साधून आठवडाभर विविध कार्यक्रम होत असून त्याची सांगता २८ मे रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता मध्यवर्ती कारागृह स्वा. सावरकर स्मारक येथून जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे दहा संस्थांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. याकरिता नियोजन करण्यात येत आहे. हिंदुत्ववादी संस्थांसह मंदिर संस्था, ज्ञाती संस्थाही यात सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा विराट होईल, याकरिता संयोजकांनी तयारी केली आहे. ही शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचली की तेथे ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. शोभायात्रेमध्ये पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हेसुद्धा सहभागी होणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालय, पतितपावन मंदिर संस्था, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ यांच्यावतीने करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 13-05-2023
