चिपळूण: प्रशांत यादव यांचा काँग्रेस तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर

0

चिपळूण : उद्योजक प्रशांत यादव यांनी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीकडून कोणताही निर्णय झाला नव्हता. मात्र, दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी यादव यांचा राजीनामा नामंजूर करून तालुकाध्यक्ष पदावर कायम कार्यरत राहण्यासाठी पत्र दिले आहे.

जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी या संदर्भात यादव यांचा राजीनामा नामंजूर केल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करून तालुकाध्यक्ष म्हणून पूर्ण क्षमतेने व जोमाने काम करण्यास यादव यांना सूचित केले आहे.

पक्षांतर्गत कुरबुरी व वरिष्ठ पातळीवर गटबाजीला कंटाळून यादव यांनी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. प्रदेशाध्यक्षांकडे हा राजीनामा त्यांनी पाठविला होता. मात्र, दोन महिन्यांपासून यादव यांच्या राजीनाम्यावरून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे चिपळुणातील काँग्रेस विस्कळीत झाल्यासारखी कार्यरत होती. पक्षीय पातळीवर होणारे कार्यक्रम व निर्णय कोणी घ्यायचे, याबाबत पक्षांतर्गत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यादव यांनी दिलेल्या राजीनाम्यावर तातडीने निर्णय व्हावा, अशी मागणी वरिष्ठ पातळीवर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. तसेच यादव यांचा राजीनामा मंजूर करू नये, अशाही भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. एकूणच पक्षांतर्गत झालेल्या घडामोडीनंतर राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.

जोमाने काम करणार : प्रशांत यादव
पक्षाने आपल्यावर पुन्हा एकदा पूर्ण विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही. पक्षवाढीबरोबरच सामान्य जनतेची कामे करण्याकरिता यापुढेही आपण पक्षातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ आजी-माजींना सोबत घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेत काम करणार आहे. राजीनामा देण्यामागे कोणतीही नाराजीची भावना अथवा कोणावरही राग नव्हता. नव्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षानेच आपल्याला पुन्हा संधी देऊन जबाबदारी देत विश्वास टाकला आहे. त्यामुळे जोमाने काम करणार असे प्रशांत यादव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 13-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here