राजापूर : मागील दोन दिवस राजापूर तालुक्यात विजांसह पावसाने हजेरी लावली असून, त्यामध्ये दोन ठिकाणी विजा पडल्या. त्यामध्ये एक बैल ठार झाल्याची घटना कोदवली येथे घडली तर नाटे येथे घरावर वीज पडून नुकसान झाले आहे. नाटे राजवाडी येथे घरावर आंबा कलम कोसळून पत्रे फुटल्याची घटना घडली.
मागील दोन-तीन दिवस सर्वत्र मळभाचे वातावरण असून गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी तालुक्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. सोबत ढगांचा गडगडाटदेखील सुरू होता. त्यातूनच वीज पडल्याचे दोन प्रकार तालुक्यात घडले.
कोदवली मधील मांडवकरवाडी येथील शांताराम गुणाजी मांडवकर यांच्या घरावर वीज पडून त्यांचा बैल मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. तर नाटे येथे दिवाकर नामदेव आंबोळकर यांच्या घरावर वीज पडून त्यामध्ये घरातील वायरिंगसह फ्रीज जळाल्याची घटना घडली.
तालुक्यात वीज पडल्याच्या दोन घटना घडल्या तर नाटे राजवाडीमध्ये दत्ताराम राघू रेवाळे यांच्या घरावर बाजूलाच असलेले कलमाचे झाड कोसळले. यात घराचे पत्रे फुटल्याची घटना घडली. या सर्व घटनांचे पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू होते. दरम्यान, बुधवारीदेखील तालुक्यात मळभाचे वातावरण होते. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. पावसाची चिन्हे दिसत होती. या पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 13-05-2023
