गुहागर : तालुक्यातील अडूर पड्याळवाडीतील २९ वर्षीय तरुणाने ११ मे रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. अनिकेत सुभाष नार्वेकर असे त्याचे नाव आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत याने गुरुवारी (दि.११) रात्री १.४५ वाजल्यानंतर राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. १२ मे रोजी सकाळी ६ च्या दरम्यान अनिकेतला उठविण्यासाठी घराच्या मंडळींनी हाक मारली. मात्र, खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून अनिकेतच्या शयनकक्षाला असलेली खिडकी उचकटून त्याचा लहान भाऊ अक्षय खोलीत शिरला. तेव्हा सिलिंग फॅनला लाल रंगाच्या ओढणीने गळफास लावून अनिकेतने आत्महत्या केल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले.
या बाबतची माहिती अनिकेतचा लहान भाऊ अक्षय नार्वेकर यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर गुहागरचे प्रभारी पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत नार्वेकर चालक म्हणून काम करीत असे. गुरुवारी रात्री काही किरकोळ कारणांवरुन त्यांचे घरी भांडण झाले होते. मित्रांकडून वारंवार किरकोळ रक्कम उधारीवर घेण्याची त्याला सवय होती. तसेच दारु पिण्याचेही व्यसन होते. तणावाखाली येवून अनिकेतने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अधिक तपास गणेश कादवडकर करीत आहेत.
दरम्यान, हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर अनिकेतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या दरम्यान अडूरमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतच्या आत्महत्येमुळे पड्याळवाडीवर शोककळा पसरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 13-05-2023