रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील माचाळ येथे ग्राम वाचनालयाचे उद्घाटन रविवारी १४ मे रोजी होणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे हे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.
माचाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. ते दुर्गम असल्यामुळे तेथे कोणत्याच प्राथमिक सोयीसुविधा नाहीत. मात्र पर्यटनस्थळ म्हणून ते विकसित व्हावे, यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ सातत्याने प्रयत्नशील आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात विशेष माचाळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गावात सातवीपर्यंतची शाळा असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते. त्यांच्यासह माचाळमधील ग्रामस्थांची वाचनाची भूक भागवण्यासाठी आता तेथे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि पाचल येथील माजी शिक्षिका श्रद्धा कळंबटे यांच्या अध्यक्षतेखाली या वाचनालयाचे कामकाज चालणार आहे. गावातील दिव्यांग रूपाली गोविंद मांडवकर या वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम करणार आहे.
या वाचनालयाचे उद्घाटन येत्या रविवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, लांजा येथील लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष अभिजित जेधे, लांज्याचे माजी तहसीलदार जयवंत शेट्ये, शिपोशी येथील वैजनाथ विष्णू आठल्ये विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शरद आठल्ये, फिरते वाचनालय उपक्रमाचे श्रीकांत पाटील इत्यादी मान्यवर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 13-05-2023
