मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेसनं बहुमताचा जादुई आकडादेखील गाठला आहे.
दुसरीकडे भाजपचा दक्षिणेचा बालेकिल्ला ढासळला आहे. यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया डबल इंजिन रुळावरून घसरल्याचं म्हटलं.
“या विजयामध्ये मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या यांनी खूप परिश्रम घेतले. काँग्रेसच्या सर्व नेतृत्वानं यात आपल्याला झोकून दिलं आणि या विजयात सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातीलही अनेक सहकारी तिकडे जाऊन आले आहेत. या मतदानात काँग्रेसच्या मतांचा टक्काही वाढला आहे. काँग्रेसच्या जागा भाजपेक्षा दुपटीनं अधिक दिसतायत. काँग्रेसचा मताचा टक्के ४३ टक्क्यांवर गेलाय. भाजपचा मताची टक्केवारी तितकीच राहिलीये. अनेक स्तरातून काँग्रेसला पाठिंबा मिळालाय हे उघड आहे,” असे अशोक चव्हाण म्हणाले.
“भाजपनं अनेक ठिकाणी ध्रुवीकरण, तृष्टीकरण करून राजकारण कसं करता येईल हे पाहिलं. जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर मागे पडल्याचं त्यांना दिसलं, तेव्हा शेवटचं हत्यार म्हणून देवधर्म आणण्याचा विषय झाला. देवधर्म हे व्यक्तीगत आस्थेचे विषय आहेत. राजकारणाचे विषय ते होऊ शकत नाही हे कर्नाटकाच्या लोकांनी दाखवून दिलंय,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या ज्या लोककल्याणकारी योजना जाहिरनाम्यात देण्यात आल्यात त्या योजनांनाही लोकांनी प्रतिसाद दिल्याचं ते म्हणाले.
डबल इंजिन रुळावरून घसरलं
“रोजगार, सुरक्षा, महागाई, शांतता असे अनेक लोकांसमोर प्रश्न होते. भाजप यावर काही बोलू शकले नाही. डबल इंजिन सपशेल रुळावरून घसरलंय हे स्पष्ट झालंय. उपरवाले की लाठी जब चलती है तो आवाज नहीं निकलती, अशी स्थिती झाली. एक्झिट पोलमध्ये जी आकडेवारी दिली त्यापेक्षाही अधिक जागा मिळेल असं वाटतं. वातावरण बदलतंय आगामी काळातही निवडणुकांत बदलांचा परिणाम दिसेल,” असंही अशोक चव्हाण यांनी नमूद केलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 13-05-2023
