रत्नागिरी : सीबीएसई बोर्डाच्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात रत्नागिरीतील सर्वंकष विद्यामंदिर प्रशालेचा (एसव्हीएम) निकाल १०० % लागला आहे. प्रशालेची विद्यार्थिनी कु. सेजल पेडणेकर हिने ९८.८% गुण मिळवत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सर्वंकष विद्यामंदिर (एसव्हीएम) प्रशालेची इयत्ता दहावीची ही पहिलीच बॅच होती हे विशेष.
प्रशालेतील कु. परीस धमगये ९६.२ द्वितीय क्रमांक व कु. स्वयम पानवलकर ९५.२ टक्के मिळवत प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच शाळेच्या ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. तर १५ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात ९० पेक्षा अधिक गुण मिळवले. इंग्रजी आणि इतर विषयांचा विचार केला तर प्रशालेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून आपले ध्येय साध्य केले आहे.
प्रशालेची इयत्ता १० वी ची पहिलीच बॅच असून शाळेने केलेली नेत्रदीपक सुरुवात यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांवर रत्नागिरीतील शिक्षण क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रत्नागिरीतील पालक आणि विद्यार्थी यांना सर्वंकष विद्यामंदिरच्या रूपाने मुलांच्या भवितव्यासाठी एक उत्तम व खात्रीशीर पर्याय मिळाला आहे. असेही मत व्यक्त होत आहे.
शाळेच्या या यशाबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थी व त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या वर्षभराच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे नमूद केले तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या आगामी वर्षात शाळा व शाळेतील विद्यार्थी असेच उत्तुंग यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:04 13-05-2023
