मुंबई | सांगली- कोल्हापूरात आलेल्या पुरामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांचं पुनर्वसन करण्याची मोठी जबाबदारी सरकारवर आहे. त्याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून 50 लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेत हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत 25 वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. पुरग्रस्तांची मदत करण्यात सरकारला अपयश आल्याची टीका राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केली. मात्र आम्ही केवळ टीका-टिप्पणी करत नाही तर प्रत्यक्ष मदतही करतो, असं मत राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात येतंय. दरम्यान, राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी आपला 1 महिन्याचा पगार पुरग्रस्तांना मदत म्हणून देऊ केला आहे. एकट्या बारामतीतून शरद पवारांच्या आवाहनानंतर 1 कोटींची मदत सांगली-कोल्हापूरसाठी करण्यात आली आहे.
