मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी आणि विरोधकांची मोठी फळी उभारण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत.
याचाच एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मुंबई दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, याबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले.
दिल्लीकरांवर मोठा अन्याय होतोय
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, शरद पवार यांचे मनापासून आभार मानतो. केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मुद्दा शरद पवार यांच्यासमोर मांडला. दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने लगेचच दिल्ली सरकारच्या अधिकारावर नियंत्रण आणणारा अध्यादेश काढला. याविरोधात गेली ८ वर्ष आम्ही लढलो. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला. मात्र, लगेचच परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमचे अधिकार हिरावले. हा दिल्लीकरांवर मोठा अन्याय होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षाचा परिणाम दिल्लीच्या विकासावर होत आहे. राज्यसभेत याविरोधात मतदान केल्यास संपूर्ण देशाला याचा फायदा होऊ शकतो. विरोधकांनी एकत्रपणे मतदान केल्याचा लाभ दिल्लीकरांना मिळेल. हा मुद्दा एखाद्या पक्षाचा किंवा विरोधकांचा नाही. हा मुद्दा देशाचा आहे. देशाबाबत आदर असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन याचा विरोध करायला हवा, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अरविंद केजरीवालांना पाठिंबा
यानंतर शरद पवार यांनी बोलताना, हा मुद्दा फक्त दिल्लीचा आहे, असे आम्ही मानत नाही. ही समस्या फक्त दिल्लीची नाही, देशाची आहे. दिल्लीत लोकशाहीवर आघात केला जात आहे. महाराष्ट्रातील जनताही याला पाठिंबा देईल. मात्र, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसही अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी आहे. तसेच भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यावर भर दिला पाहिजे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 25-05-2023