फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलीय, अजून थोडे महिने राहिलेत; खा. विनायक राऊतांची टीका

0

मुंबई : नवीन संसद भवनाचे उद्घाटन महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते व्हावे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. परंतु राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला न बोलावता पंतप्रधानच नूतन वास्तूचे उद्घाटन करणार आहेत.

२८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. यावरून आता राजकारण तापले आहे. २० विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला होता. उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय, अशा शब्दात फडणवीसांनी बोचरी टीका केली. यावेळी, एकनाथ शिंदे यांनी मान हलवत बरं म्हणून फडणवीसांच्या उत्तराला हसत-हसत दाद दिली. तसेच, उद्धव ठाकरेंना जी जागा दिली होती, तिथे ते जात नाहीत. विधानपरिषदेचे सदस्य आहेत, २ तास जाऊन तिथे बसत नाहीत. मग, त्यांना कोण लोकसभेत बोलावणार आहे, कोण पार्लमेंट हाऊसमध्ये बोलावणार आहे?, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची एकप्रकारे खिल्ली उडवली.

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला आता ठाकरे गटानेही प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती खूप गेली आहे. अजून थोडे महिने राहिले आहेत. नंतर त्यांना त्यांची जागा कळून चुकेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. तर सध्या एआयएमआयएम आणि बीआरएसची स्थिती स्पष्ट नाही. मात्र, अशी माहिती समोर येत आहे की, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा अध्यक्षांनी नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यास आमचा पक्ष सहभागी होईल, अन्यथा आम्ही बहिष्कार टाकू, असे म्हटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सुनावले. लोकशाहीमध्ये अशाप्रकारचे कावीळ झाल्यासारखे वागणे हे अत्यंत अयोग्य आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणे सांगत आहेत ती हास्यास्पद आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 25-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here