शासकीय अधिकारी, कर्मचारी पोहोचले गावागावात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

रत्नागिरी : सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी, तलाठी गावागावात जाऊ लागले आहेत. सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे अधिकारी करत आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमाचाच तो एक भाग आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

शासन आपल्या दारी उपक्रमाचा प्रारंभ आज रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. त्यावेळी श्री. शिंदे बोलत होते.

ते म्हणाले, लोकांना कचेरीत चकरा माराव्या लागू नयेत, सरकारी काम सहा महिने थांब हे आम्हाला बदलायचे आहे. चकरा मारणे, खेटे मारणे हा शब्द आम्हाला काढून टाकायचा आहे. आम्ही घरी बसून काम करणारे नाही. फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणारे नाही. आम्ही घराघरात, गावागावात जाऊन काम करणारे आहोत. आता विकासाची गाडी सुसाट धावते आहे. सगळे अडथळे काढून टाकले आहेत. शेतीचे नुकसान झाले, तेव्हा मी बांधावर नाही, तर थेट शेतावर गेलो. तिथल्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाके आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ही दोन चाके जेव्हा समान वेगाने धावतात, तेव्हा त्या गावाचा, शहराचा त्या राज्याचा विकास होतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून सगळे अधिकारी चांगले काम करत आहेत. आता कलेक्टर आणि विभागीय आयुक्तही वेगाने काम करू लागले आहेत. यामुळे सरकारी यंत्रणा सक्रिय होते. त्याचा लाभ लोकांना मिळतो. आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. मुख्यमंत्री म्हणून मी आज उभा असलो, तरीही कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. काम करण्याची जी सवय आहे, बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली आहे, त्याच्या माध्यमातून राज्याला पुढे नेत आहोत. कोणाचीही गैरसोय होता कामा नये, हे आमचे लक्ष्य आहे. समाजात शासनाबाबत लोकांचे तयार झालेले मत बदलायचे आहे. म्हणूनच मी आणि देवेंद्र फडणविसांनी शासनाच्या योजना घरोघरी गेल्या पाहिजे असे ठरविले, असेही श्री. शिंदे म्हणाले

आपल्या सरकारने आल्या आल्या ७५ हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला. बहुधा हे असे पहिले सरकार आहे, जे लोकांना बोलवून त्यांना नियुक्त्या देते. सर्वसामान्य लोकांचे भले करणे हेच आमचे लक्ष्य आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 25-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here