देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांबाबत अभिमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

रत्नागिरी : महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षमपणाने गृहमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस देशात अग्रेसर आहेत. त्या अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.

शासन आपल्या दारी या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली १० बोलेरो वाहने, २० मोटारसायकली आणि चार बसेस पोलीस दलाकडे गुरुवारी सुपूर्द करण्यात आल्या. येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते.

ते म्हणाले, या वाहनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास निश्चितपणाने मदत होईल. पोलिसांच्या घरनिर्मितीला त्याचबरोबर त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलीस सक्षमपणाने कार्यरत राहिल्यामुळे नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. नागरिकांना पोलिसांची भीती वाटता कामा नये, तर चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत राहावे. वयाच्या ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना शासनाने बंदोबस्ताबाबत सवलत दिली आहे. पोलिसांना अनेक वेळेला आनंदाचे क्षण त्यांच्या कुटुंबीयासोबत घालवयाचे असतात. तथापि कार्यबहुलतेमुळे त्यांना ते शक्य होत नाही. गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली असल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

यावेळी पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 26-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here