मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील राजकीय आंदोलकांवर दबावापोटी अत्याचार सुरू आहेत. याप्रकरणी रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत यांच्यासह बारसू ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेतली.
रिफायनरीला विरोध करणाऱ्या बारसूतील ग्रामस्थांवर पोलिसांकडून अमानुष अत्याचार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आदेश दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली. पोलिस हे फक्त राजकीय दबावापोटी करीत आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी एका मुलीने आपली तक्रार मांडली असता तिला पोलिस अधीक्षकांनी बोलावून धमकी दिल्याचा प्रकारही घडला आहे. या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी पोलिस महासंचालकांकडे केली.
पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने पोलिस महासंचालकांना दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 26-05-2023
