रत्नागिरी : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेनंतर पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली आहे. पंपांवर दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण नेहमीपेक्षा दुपटीने वाढले आहे. त्यामुळे अनेक पंपचालकांनी सुट्टे पैसे नसल्याची ओरड आता सुरू झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचे जाहीर केल्यानंतर पंपावर ग्राहकांकडून दोन हजारांच्या नोटा देण्याचे प्रमाण वाढले. काही ग्राहक तर किरकोळ शंभर अथवा दोनशे रुपयांचे पेट्रोल भरून दोन हजारांची नोट देत आहेत. अशा ग्राहकांना सुट्टे पैसे देण्याची अडचण पंपचालकांसमोर उभी राहिली आहे. त्यामुळे अनेक पंपचालकांनी किमान पाचशे अथवा हजार रुपयांचे पेट्रोल भरले तरच दोन हजारांची नोट स्वीकारली जाईल, असे फलक लावले आहेत. सुट्टे पैसे नसल्याने दोन हजारांची नोट स्वीकारली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
शंभर अथवा दोनशे रुपयांचे पेट्रोल भरून ग्राहक दोन हजारांची नोटा देत आहेत. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत पंपांवर दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण २० ते २५ टक्के वाढले आहे. या नोटा वाढल्याने सुट्ट्या पैशांची समस्या निर्माण झाल्याची प्रतिक्रिया येथील पंपचालकांकडून व्यक्त करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 26-05-2023
