भारतातून लूटून नेलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये विक्रमी 143 कोटींना लिलाव

0

म्हैसुरचा वाघ अशी ख्याती असलेल्या टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला असून त्याला आतापर्यंतची विक्रमी म्हणजे 143 कोटींची किंमत मिळाली आहे.

लिलावातून मिळालेली रक्कम ही अपेक्षेपेक्षा सात पट अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. ही तलवार आतापर्यंत विकली जाणारी सर्वात महागडी भारतीय आणि इस्लामिक वस्तू बनली आहे.

श्रीरंगपट्टनच्या लढाईत, 1799 साली ब्रिटिशांनी टिपू सुलतानचा पराभव केला आणि त्यावेळी त्याच्याकडील ही तलवार आपल्या ताब्यात घेतली. टिपू सुलतानच्या महत्त्वाच्या शस्त्रांमध्ये या तलवारीचा समावेश होता. त्याच्या हँडलवर सोन्यामध्ये ‘Ruler’s Sword’ असे लिहिले आहे.

टिपू सुलतानची ही तलवार जर्मन ब्लेडचा वापर करुन तयार करण्यात आली होती. या तलवारीच्या मुठेवर सोन्याने शब्द कोरलेले आहेत. यामध्ये देवाचे पाच गुण सांगितले आहेत.

4 मे 1799 रोजी टिपू सुलतानच्या पराभवानंतर, श्रीरंगपट्टन येथून त्याची बरीच शस्त्रे लुटली गेली. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने टिपू सुलतानच्या सैन्याचा पराभव केला तेव्हा त्यांनी ही तलवार त्याच्या श्रीरंगपटन येथील राजवाड्यातून लुटली. युद्धात टिपू मारला गेला. ब्रिटीश आर्मीचे मेजर जनरल डेव्हिड बेयर्ड यांना ही तलवार बक्षीस म्हणून भेट देण्यात आली होती. तलवार म्हणजे ब्रिटीश सैनिकांच्या शौर्याबद्दल आणि युद्धातील त्यांच्या वर्तनाबद्दल आदराचे प्रतीक समजली जायची.

चीनच्या शेवटच्या राजाचे घड्याळ 51 कोटींना विकले

टिपू सुलतानच्या तलवारीशिवाय चीनचा शेवटचा राजा असीन जिओरो पुई याचे एक घड्याळही दुसऱ्या लिलावात विकले गेले आहे. हे घड्याळ 51 कोटी रुपयांना विकण्यात आले आहे. अहवालात असे सांगण्यात आले की खरेदीदार आशियाई वंशाचा व्यक्ती आहे.

हे घड्याळ चीनच्या राजाने त्याच्या रशियन दुभाष्याला भेट म्हणून दिल्याचे सांगितले जाते. या दुभाष्याला नंतर रशियात कैद करण्यात आले. आजवर विकले गेलेले हे कोणत्याही राजाचे सर्वात महागडे घड्याळ आहे. यापूर्वी 2017 मध्ये व्हिएतनामचा राजा बाओ दाई यांचे घड्याळ 41 कोटी रुपयांना विकले गेले होते.

या आधी टिपूच्या पेंटिंगचा 6.28 कोटींना लिलाव

टिपू सुलतानच्या 1780 मधील ईस्ट इंडिया कंपनीवरील ऐतिहासिक विजयाचे चित्रण करणाऱ्या पेंटिंगचा गेल्य वर्षी लंडनमध्ये लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी या पेंटिंगची विक्री 6,30,000 पौंड म्हणजेच सहा कोटी 28 लाख रूपयांना झाली होती. 10 सप्टेंबर 1780 रोजी दुसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धाचे ‘बॅटल ऑफ पोलीलूर’ वर्णन करणारे हे पेंटिंग आहे. पोलीलूरच्या युद्धाचा आणि विजयाचा दस्तऐवज असावा यासाठी टिपू सुलतानने हे चित्र 1784 मध्ये श्रीरंगपट्टनच्या दर्या दौलत बागेत हे पेटिंग लावण्यात आलं होतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 26-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here