आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांची औकात दाखवायची ताकद शिवसैनिकांच्या मनगटात; तानाजी सावंत यांचे वक्तव्य

0

मुंबई : राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील वाद काही नवीन नाही. अनकेदा हा वाद चव्हाट्यावर देखील आला आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी परभणी (Parbhani) येथे बोलताना अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचे प्रश्न आदरानं सोडवले पाहिजेत. तसेच कुठलाही आयएएस आणि आयपीएस अधिकारी असेल त्यांना त्यांची औकात दाखवायची दणकट ताकद माझ्या शिवसैनिकांच्या मनगटात असल्याचे वक्तव्य सावंत यांनी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अधिकारी विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवीन वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले तानाजी सावंत?

परभणी येथे बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, प्रशासनाला मी काय बोललो आणि काय सुचवले हे आमच्या लोकप्रतिनिधीला माहित आहे. कारण आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय घेत असतो. त्यामुळे अजून प्रशासनाच्या डोक्यातून जर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जात नसेल तर माझा रस्त्यावरचा शिवसैनिक तुमच्या डोक्यातील प्रशासन पायावर आणल्या शिवाय राहणार नाही. कारण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न तुमच्याकडे मांडत असतो. त्यामुळे तुम्हाला जर आमचे शासन पचत नसेल, तर मी तुम्हाला विनंती करतो जे काही आयएएस आणि आयपीएस अधिकारी असतील त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर बदली करून घ्यावी. तर कुठलाही आयएएस आणि आयपीएस अधिकारी असेल त्याला त्याची औकात दाखवायची दणकट ताकद माझ्या शिवसैनिकांच्या मनगटात आहे. मला वाटते एवढा इशारा काफी आहे.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, तर त्यांनी आपली लक्ष्मण रेषा ओलांडू नयेत, माझा शिवसैनिक देखील त्याची लक्ष्मण रेषा ओलांडणार नाही. पण ज्यावेळी अशी वेळ येईल त्यावेळी माझी शिवसैनिकाच्या डोक्यात काही रहात नाही, त्याच्या गुडघ्यात जाते. त्यामुळे तुमच्या कुठे लागेल सांगता येत नाही. तसेच प्रशासनाला देखील इशारा देतो, आमचे लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक जनतेसाठी कामे करतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न आदरानं सोडवला पाहिजे, असे तानाजी सावंत म्हणाले.

रुग्णालयाचे लोकार्पण…

परभणीत 100 खाटांच्या स्त्री रुग्णालय व डीईआयसी इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी दुपारी 1 वाजता पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मॉड्युलर आयसीयू कॉम्प्लेक्सची पाहणी करून त्यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थिती होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 27-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here