राजापूर : मांजराचा पाठलाग करताना बिबट्याची झेप चुकली आणि तो विहिरीत पडला. ही घटना तालुक्यातील तळवडे वाकडवाडी येथे गुरुवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली.
वन विभागाच्या रेस्क्यू टीमने विहिरीत मोठा पिंजरा सोडून आत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले आणि नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. हा बिबट्या सहा महिने वयाचा असून मादी प्रकारातील असल्याची माहिती वनविभागाने दिली. सीताराम तुकाराम चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची बाब लक्षात येताच गावचे तलाठी अजित पाटील यांनी वनपाल राजापूर घाटगे यांना याबाबतची खबर दिली. त्यानंतर वनपाल यांनी वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांना माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या विहिरीला कठडा नसून विहीर तीस फुट खोल आहे. विहिरीमध्ये मांजर व बिबट्या दिसून आले. मांजर मृत झाले होते. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विहिरीत मोठा पिंजरा सोडण्यात आला. जवळपास दोन ते अडीच तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. पशुसंवर्धन अधिकारी लांजा यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून करण्यात आली. विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन नीलख यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. प्रकाश सुतार, सदानंद घाडगे, विक्रम कुंभार, प्रभू साबणे, दीपक म्हादे, विजय म्हादे, गणेश गुरव, प्रथमेश म्हादे, नीलेश म्हादे, गायत्री साळवी, पोलिस पाटील शीतल कोटकर, कमलाकर पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 6/2/2023
