देवरूख-कुडवली मार्गावरील मोरीला भगदाड

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख- कुडवली मार्गावरील पाटगाव पूर सीमेवर असणाऱ्या मोरीला मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भगदाड पडले. मोरीखाली भराव टाकण्यात न आल्याने हे भगदाड पडले. पावसाळ्यात हे भगदाड आणखी वाढत गेले तर हा मार्गच बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने भराव टाकून हे भगदाड बुजवण्यात यावे, अशी मागणी पाटगाव, पूर, कुडवली, धामापूर येथील नागरिकांनी केली आहे.

देवरूखसह पाटगाव, पूर, कुडवली, धामापूर आदी गावांना हा रस्ता जोडलेला आहे. शाळेत जाणारी मुले, रुग्णालयात जाणारे रुग्ण, नोकरीसाठी ये-जा करणारे कामगार, नोकरवर्ग हा मार्ग कमी अंतराचा म्हणून याचा उपयोग करतात. मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी डागडुजी न झाल्याने सध्या हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यात मंगळवारी १२ वाजताच्या सुमारास या मार्गावर पाटगाव ते पूर गावच्या सीमेदरम्यान असलेल्या मोरीवर मोठा खड्डा पडला आहे.

मोठ्या खड्ड्यामुळे कोणताही अनर्थ वा अपघात घडू नये यासाठी कुडवली येथील मिलिंद जाधव, अमित जाधव (उपसरपंच), सुषमा जाधव, मनस्वी जाधव व पूर येथील सिताराम झेपले यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावून सदर खड्ड्याच्या बाजूने दगड लावून ठेवले आहेत. तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना या धोकादायक स्थितीची कल्पना दिली.

या पडलेल्या खड्ड्यामुळे येथील सुरू असलेली बसफेरी बंद पडली आहे. जून महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे बसफेरी अभावी स्थानिक प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने खड्डा भराव टाकून बुजवावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:15 PM 6/2/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here