चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील दापोली, मंडणगडचे सर्वाधिक नुकसान

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात दापोली, मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दापोलीमधील काही गावातील 95 टक्के घरांना फटका बसला असून दुरुस्ती आणि पंचनामे करण्याचे कामे युध्दपातळीवर सुरु आहे. विजेचे खांब, वाहिन्या तुटल्यामुळे दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे त्यापासून काही अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्यांना जबदरस्त तडाखा बसला. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्रा कागदासारखी उडून जमीनिवर कोसळत होती. छतच राहीलं नाही, त्यामुळे मिळेल तिथे आधार घेत कुटुंबातील ही मंडळी उघड्या डोळ्यांनी झालेले नुकसान पाहत होती. हे चित्र या तीन तालुक्यातील सर्वाधिक पाहायला मिळाले. विजेचे खांब कोसळल्यामुळे पुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवर कोसळल्यामुळे नेटवर्कही गायब झालेले होते. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्याशी काजू, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हर्णे बंदराजवळील नाडे गावातील सुमारे 80 घराचे या रस्त्यांवरील वाहतूक झाड पडून बंद झाली होती. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. चिपळूण येथील शासकीय गोदामाच्या छतावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून अंशतः नुकसान झाले. चिपळूण 1 रस्ता, खेड 2 रस्ता एकेरी वाहतूक सुरु आहे. मंडणगड-म्हाप्रळ रस्त्यावर झाडे हटवून रस्ता मोकळा करण्यात आले आहे. वादळाच्या पार्श्वभुमीवर मंडणगड तालुक्यात नारायणनगर, वेळास, बाणकोट व वाल्मिकीनगर या चार गावांतील लोकांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले होते. त्या चारही गावात झाडे कोसळून पडणे, घरावरील कौले व पत्रे उडून गेले होते. वाडे कोसळणे, घरे पडणे, इमारतीवर छप्परे उडून जाणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले आहे. वादळामुळे झाडे उन्मळून पडली होती. गावांचा संपर्कही तुटला होता. तालुक्यात तीन हजाराहून अधिक विज खांब तुटल्याने खंडीत झालेला विज पुरवठा अजूनही खंडित आहे. स्थानीक महसुल प्रशासन यासंदर्भात नुकसानीचे पंचनामे करीत असून तालुक्यातील वीज पाणी व दुरसंचार सेवा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. मंडणगड तालुक्यातील 109 गावातील शेकडो घरांची छप्परे तुटलेली होती. महसुल विभागामार्फत पंचनामे सुरु आहेत. या व्यतिरिक्त संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तिन तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, दापोली व मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. 3 हजार झाडे पडली आहेत. 14 सबस्टेशन, 1962 ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब पडले आहेत, पाणीपुरवठ्याची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here