रत्नागिरी : बीएसएनएलच्या सेवेचा जिल्ह्यात पूर्णतः बोजवारा उडाला आहे. महावितरणच्या वीजबिलापोटी ७८ लाख ५६ हजार इतकी रक्कम थकीत असल्याने बीएसएनएलचे जिल्हाभरात तब्बल ११० टॉवर बंद आहेत. या टॉवरच्या कार्यक्षेत्रातील हजारो ग्राहक सध्या नॉट रिचेबल आहेत. मागील वीस दिवस ११० टॉवरच्या कार्यक्षेत्रातील सेवा खडित आहे. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मुख्य कार्यालयाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी येथील प्रधान कार्यालयाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. बीएसएनएल कंपनीचे हजारो मोबाईल टॉवर आणि लँडलाईनसाठी शेकडो एक्स्चेंज आहेत. त्यावरून ग्राहकांना सेवा पुरवली जाते. यासाठी महावितरण कंपनीकडून घेण्यात आलेल्या जोडणीसाठी महिन्याला सुमारे कोट्यवधी रुपये बिल बीएसएनएल कंपनी महावितरणला भरते. राज्यासाठी दिल्लीतन हे फायनांसियल फंड त्या-त्या कार्यालयाला वर्ग होतात. मात्र यावेळी बीएसएनएलच्या दिल्ली कार्यालयातून जिल्ह्यासाठीचा फंड वितरित झालेला नाही. महावितरण कंपनीला प्रत्येक महिन्याला त्या-त्या तारखेला वीज बिल भरावे लागते. ते भरले नाही, तर कंपनी विद्युत पुरवठा खंडित करते. बीएसएनएलवर हीच नामुष्की ओढवली आहे. जिल्ह्यात महावितरणचे अडीच लाख ग्राहक आहेत. परंतु, टॉवर बंद असल्याने अनेक भागातील ग्राहकांची सेवा अनेक दिवसांपासून खंडीत आहेत. खासगी कंपन्यांशी स्पर्धा करीत बीएसएनएलने जिल्ह्यातही मोबाईल टॉवरचे मोठे जाळे पसरले आहे. बीएसएनएलच्या वीज ग्राहकांना अखंड आणि अविरत सेवा देता यावी यासाठी बीएसएनएलचे जिल्ह्यात ३२६ मोबाईल टॉवर आहेत. या ३२६ टॉवरच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ग्राहकांना बीएसएनएल सेवा पुरवली जाते. मात्र महावितरणच्या जोडणीवर जे टॉवर सुरू होते. त्यापैकी ११० टॉवरचे सुमारे ७८ लाख ५६ हजार वीज बील थकीत आहे. बीएसएनएलकडून वेळेवर बील न भरले गेल्याने पंधरा दिवसांपूर्वी वीज पुरवठा खंडित केला आहे. ११० टॉवरवरील लाखो ग्राहक आउट ऑफ कव्हरेज एरियामध्ये आहेत.
