कोकणवासीयांमध्ये सरकारच्या विरोधात संतापाची लाट

0

रत्नागिरी : सांगली, कोल्हापूरसह कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही पुराने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील अनेक शहरांमधील बाजारपेठा पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले. मात्र, पुरामुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा कोकणात फिरकलेली नाही. पूरग्रस्तांना सरकारने दिलेला मदतीचा हातही अत्यंत तोकडा असल्याने कोकणवासीयांमध्ये सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. सांगली, कोल्हापूरसह कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही पुराने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु राज्य सरकारने कोकणाकडे पूर्ण पाठ फिरविली असून केवळ दोन कोटींची अत्यल्प मदत कोकणाला दिली आहे. सरकारच्या या भूमिकेवर कोकणात संताप व्यक्त होत आहे. केवळ दोन कोटी रुपयांची मदत देण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी ते अजून मंत्रालयातील कागदावरही आलेले नाही. सरकारच्या या सापत्न वागणुकीबद्दल कोकणी माणसामध्ये कमालीची चीड व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचा एक भाग तयार करून त्यांना ४ हजार ७०० कोटींची मदत राज्य सरकारने केंद्राकडे मागितली आहे, तर नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्राच्या गटात कोकणचा समावेश करून या भागांसाठी २ हजार १०० कोटींची मदत सरकारने मागितली आहे. ही मदत कधी मिळेल याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे सरकारकडून कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम करीत असल्याची भावना आहे. कोकणातील भात, नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, बांदा आणि अन्य भागांत पुरामुळे तसेच धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोकणात एकही मंत्री न फिरकल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शिवसेनेचे अनेक मंत्री कोकणातील असले तरी त्यांनी सरकारवर दबाव टाकल्याचे दिसत नाही. कोकणात पूर आलेला असताना कोकणातील एक मंत्री मुंबई उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कौटुंबिक कार्यक्रम साजरा करीत होते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथील आमदार हे सरकारवर दबाव आणून, पूरग्रस्तांसाठीचा निधी आपल्या भागात नेत आहेत, तर कोकणातील लोकप्रतिनिधी आरामात असल्याने सोशल मीडियावरून या लोकप्रतिनिधींवर तीव्र टीका होत आहे. कोकण पट्ट्यातील आंबा, काजू, कोकम या फळबागांचे नुकसान झाले आहे. नेहमी ऊस, कापूस, द्राक्षे, धान यांचे नुकसान झाले की सरकार तातडीने मदत करते, तशी तत्परता सरकार कोकणातील आंबा, काजू, भात, कोकम आदीच्या नुकसानीबद्दल दाखवत नाही, अशी खदखद कोकणवासीयांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here