रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट २०१९ रोजी माधवराव मुळे सभागृह, शेरेनाका येथे चतुरंग प्रतिष्ठान, चिपळूण यांच्या वतीने गेल्या वर्षी प्रमाणेच कीर्तन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या आयुष्याचे योगदान देणाऱ्या, जीवाचीही पर्वा न करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे, स्वातंत्र्यसेनानींचे, क्रांतिकारकांचे स्मरण करणे व त्यांच्या हौतात्म्याचे, बलिदानाचे जाहीर अभिवादन करणे या हेतूने रत्नागिरीमध्ये २०१८ पासून स्वातंत्र्याचे पूर्वरंग हा उपक्रम सुरु करण्यात आला. संवेदनशील रत्नागिरीकरांनी या उपक्रमास मनापासून प्रतिसाद दिला. गतवर्षी रत्नागिरीकरांच्या पसंतीस उतरलेले कीर्तनचंद्र श्रेयस बडवे व मानसी बडवे हेच कीर्तनकार दाम्पत्य यावर्षीही कीर्तन जुगलबंदी सादर करणार आहेत. यावर्षीच्या कीर्तन जुगलबंदीचे शीर्षक ‘कथा स्वातंत्र्याची.. गाथा बलिदानाची..!’ हे आहे. वेळोवेळी स्वातंत्र्यासाठी होणाऱ्या लढाईत अनेक स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांही तितक्याच सक्षमपणे सहभागी झाल्या. कधी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर कधी अप्रत्यक्ष समर्थपणे पाठींबा दिला. आपल्या देशासाठी दिलेल्या अनेक स्त्री-पुरुषांच्या बलिदानाची गाथा या कीर्तनाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे, रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा कार्यक्रम पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृह, (संघ कार्यालय) माधवराव मुळे भवन, शेरे नाका, रत्नागिरी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार १४ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या कीर्तन जुगलबंदीचा रत्नागिरीकरांनी आवर्जून लाभ घ्यावा अशी विनंती रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि चतुरंग प्रतिष्ठान चे विद्याधर निमकर यांनी केले आहे.
