रत्नागिरी : रत्नागिरी हे दुसरे घर असे सांगत विविध निवडणुकांमध्ये मते मागणारे शिवसेनेचे रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत आणि रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर अतिवृष्टी व पूरस्थितीमध्ये जिल्ह्यात फिरकलेच नसल्याने जिल्हावासीयांमधून संताप व्यक्त होत आहे. मते घेतल्यानंतर आमच्या संरक्षणाची जबाबदारी संपते का असा सवाल येथील जनता उपस्थित करत आहे. कोकण आमचे दुसरे घरच असे सांगत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांपासून प्रत्येक शिवसेना नेता येथील जनतेला भावनिक साद घालत असतो. त्याच एका जोरावर मते मागून निवडणूका जिंकत असतो. याही लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझीच अशा वल्गना रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केल्या होत्या. परंतु निवडणूका संपल्या आणि बहुतेक खासदार ही आश्वासने विसरले कि काय असा प्रश्न आता जिल्हावासीयांना पडला आहे. गेले दीड महिना रत्नागिरी जिल्हा विविध आपत्तीमधून जात आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण कोसळल्याची घटना घडल्यानंतर सातत्याने जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्याच्या ज्ञात इतिहासामध्ये प्रथमच मुंबई- गोवा महामार्ग खेड आणि चिपळूण येथील पुरामुळे किमान दहावेळा बंद करावा लागला आहे. दोन्ही तालुक्यासह राजापुरातील बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे तेथील बाजारपेठामधील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरडी कोसळून जनता भयभीत झाली आहे. मात्र असे असताना खासदार विनायक राऊत आणि जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले राज्यमंत्री रवींद्र वायकर हे या दीड महिन्यामध्ये जिल्ह्यात फिरकलेलेच नाहीत. यामुळे जिल्हावासीय संतप्त झाले आहेत. अनेक गावांमध्ये शासकीय मदत पोहोचलेली नाही, यंत्रणा हतबल आहे, जनता बेहाल आहे. परंतु खासदार विनायक राऊत गायब आहेत तर पालकमंत्री गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतून घोषणा करत आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत दोघांनी जिल्ह्यात आपले कार्यक्रम लावून घेतले आहेत. त्याचवेळी पूरग्रस्तांसाठी बैठकही होणार आहे. परंतु ज्यावेळी जनतेला दिलासा देण्याची गरज होती, शासकीय यंत्रणेच्या कामाचा लेखाजोखा घेणे आवश्यक होते.
