रत्नागिरी : रिक्षाला ठोकर दिल्याचा गैरसमज करुन दुचाकीस्वारासमोर रिक्षा आडवी मारत त्याला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच दुचाकीची चावी, खरेदी केलेले सामान व त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवल्याप्रकरणी रिक्षा चालकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी १ वा. सुमारास मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर घडली. सचिन शांताराम रणसे (२९, रा. पाडावेवाडी मिरजोळे) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात दुचाकी चालक ओंकार सुरेंद्र जाधव (३७, रा. नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी जाधव आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-० -पी-९९४२) घेऊन एसटी स्टॅण्ड ते आरोग्य मंदिर असे येत होते. त्यावेळी सचिन रणसे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८-ई-८०७१) घेऊन त्याठिकाणी आला व ओंकारला म्हणाला कि तू माझा रिक्षा ठोकली आहेस त्याचे एक हजार रुपये दे. त्यावर ओंकाराने रिक्षाला ठोकर दिली नाही असे म्हटले या रागातन सचिनने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याने ओंकारच्या गळ्यातील सोन्याची चेन, गाडीची चावी व खरेदी केलेले सामान घेऊन सचिनने तेथून पळ काढला. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
