रत्नागिरी- आंबा घाटातील कामासाठी शासनाकडे अडीच कोटीचा प्रस्ताव रवाना

0

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात कोसळलेल्या भागाचा भराव मातीने भरणे, रुंदीकरण, बाजूपट्टींचे खडीकरण आणि रस्ता डांबरीकरणासाठीचा अडीच कोटीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला पाठवला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ढगफुटीसारखा पाऊस पडला. त्यामुळे आंबा घाटातील शंभर मीटर रस्त्याचा दरीकडील भाग खचला असून रस्त्याच्या मधोमध भेगाही पडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी घाटात रस्ता रुंदीकरण केले होते. त्याठिकाणच्या बाजूपट्टीकडील माती कोसळली. भुगर्भातील हालचालींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी अशी शक्यता बांधकाम विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. सध्या घाटामधून एकतर्फी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. दुहेरी वाहतूक सुरु ठेवण्यासाठी खचलेल्या भागाच्या विरुद्ध बाजूला काही मीटरचा भाग शिल्लक आहे. तो मजबूत करुन डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्या बाजूला सुरक्षेसाठी संरक्षक भिंतही बांधण्याचा विचार सुरु आहे. तसे केल्यास त्या परिसरातील रस्ता ९ मीटर होईल. रस्त्याला गेलेल्या भेगांवर तात्पुरत्या उपाययोजना म्हणून सीलींग करण्यात आले आहे. पाऊस गेल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान बाजूपट्टीकडील भागाचे डांबरीकरण करुन दुहेरी मार्ग सुरु केला जाणार आहे. त्यासाठी अडीच कोटीचा निधी आवश्यक आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. सुरक्षेसाठी आंबा घाटातील या धोकादायक भागावर बांधकाम विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्त्याच्या भेगा रुंदावणे किंवा बाजपट्टीकडील भाग कोसळण्याची शक्यता कमी आहे. पावसानंतर आंबा घाटातील नादुरुस्त भागात घडलेल्या भुगर्भातील हालचालींचा हा परिणाम असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. बांधकाम विभागाकच्या रस्ता सुरक्षा समितीमधील तज्ज्ञांकडून यावर संशोधन केले जाणार आहे. आंबा घाटात पडलेल्या भेगा किती खोलवर आहेत याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पावसाळा संपला की कायमस्वरुपी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here