खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदेवी हद्दीत ज्वलनशील वाहतूक करणारा टँकर उलटून झालेल्या अपघातात टँकरमधून वायूगळती झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी रात्री ९.३० ते १०.३० या कालावधीत महामार्ग ठप्प झाला होता. मुंबईहून लोटेच्या दिशेने ज्वलनशील वाहतूक करणारा टैंकर चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने घाटातील धामणदेवी हद्दीनजीक टैंकर उलटून अपघात झाला होता. या अपघातानंतर वायूगळती सुरु झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात येऊन घाटाला पर्यायी असलेल्या विन्हेरे मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. अखेर रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वायू गळती थांबवून महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.
