रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मुलाखतीशिवाय असणाऱ्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी मंगळवारपासून सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात मंगळवारी ११० उमेदवारांची नोंदणी करण्यात आली. त्यांची कागदपत्र पडताळणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले. या भरतीवर नागपूर खंडपीठात याचिका दाखल असल्याने त्या केसचा निकाल लागेपर्यंत नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत, असे गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले. २१ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे पडताळणी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ५ साठी ४५४ जागा तर ६ ते ८ साठी २०५ जागांवर भरती करण्यात येत आहे. त्यानुसार कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया सरू झाली आहे. दुसऱ्या बाजुला या भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलण्यात आल्याने आंदोलन उभारण्याची तयारी स्थानिक स्तरावर सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींची साथ स्थानिकांना मिळत आहे. त्यामुळे ही भरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
