‘जी-7 परिषदेत अमेरिकेसोबत काम करून भारताला आनंदच होईल’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जी-7 विस्ताराच्या योजनेचा भाग बनत असतानाच अमेरिकेसोबत काम करून भारताला आनंदच होईल, असे मत भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनद्वारे चर्चा झाली. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे सतत एकमेकांच्या संपर्कात आहेत. याव्यतिरिक्त दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारीही सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात. 2 जून रोजी पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या अन्य मुद्द्यांसह जी-7 शी निगडीत काही मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांची जी-7 चा विस्तार करण्याची इच्छा आहे. तर भारतालाही अमेरिकेसोबत काम करण्यास आनंद होईल, असे संधू म्हणाले. जी-7 देशांचा विस्तार करतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियालादेखील सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु या विस्तारावर चीनने टीका केली आहे. चीनवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिका हा खेळ खेळत आहे आणि म्हणूनच भारताला जी-7 चा भाग बनवण्याचा विचार सुरू असल्याचे चीनने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here