रत्नागिरी : रत्नागिरीतील एमआयडीसी येथून जप्त करण्यात आलेल्या ५० लाखांच्या कोकेन प्रकरणी पोलिसांनी सातव्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संजय छाजुराम चौहान (रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या सातव्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील एका कर्मचाऱ्याला रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीला येणार असल्याची टीप एका खास खबऱ्याकडून मिळाली होती. कोस्टगार्डमधील रामचंद्र मलिक, सुनील कुमार रणवा हे दोघे भारतीय हवाई दलातील कर्मचारी मुकेश शेरॉन याच्या संपर्कात होते. मुकेशने कोकेन विक्रीसाठी ५० लाखांचे गिहाईक शोधण्याची जबाबदारी दोघा कोस्टगार्ड कर्मचाऱ्यांकडे दिली होती. खबऱ्याने पोलिसांना टीप दिल्यानंतर पोलिसांनी स्वतःच खरेदीदार बनून छापा टाकण्याचा प्लॅन तयार केला. रत्नागिरी एमआयडीसी येथून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर राजस्थान येथून अंकित सिंग याने दिनेश सिंग याच्यामार्फत कोकेन रत्नागिरीत पाठविले. तर अंकितला कोकेन देणाऱ्या तरूणाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. कोकेन प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात सातवा आरोपी संजय चौहान याला अटक करण्यात आली असून या प्रकरणातील मास्टर माईंडच्या शोधात पोलीस आहेत.
