रत्नागिरी : ग्रामीण विकासाला चालना देऊन ग्रामपंचायतींमध्ये आधुनिक सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३८६ ग्रामपंचायती नेटवर्कमध्ये आणण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आतापर्यंत ३७१ ग्रा.पं. या योजनेतून जोडण्यात आल्या आहेत. रत्नगिरीसह मंडणगड तालुक्यात ही कामे शंभर टक्के झाली आहेत. संगमेश्वर आणि खेडमध्येही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले असल्याने या चार तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल क्रांती झाली आहे. भारतातील प्रत्येक खेड्यापर्यंत ऑप्टीकल फायबर केबल नेटवर्क पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने नोफान प्रकल्प हाती घेतला आहे. प्रत्येक खेड्यापर्यंत मोबाईल, ब्रॉडबँड आणि इंटरनेटचे नेटवर्क पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायती या नेटवर्कने जोडल्या जाणार आहेत. दोन टप्प्यात जिल्ह्यात हे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टण्यासाठी ३० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, खेड आणि मंडणगड या चार तालुक्यातील ३८६ ग्रामपंचायती नेटवर्कमध्ये आणल्या जाणार आहेत. त्यासाठी जवळपास ७७३ कि.मी.ची केबल टाकली जाणार आहे. दुर्गम समजल्या जाणाऱ्या मंडणगड तालुक्यात हे काम शंभर टक्के पूर्णत्वाला आले आहे. आतापर्यंत ३७१ ग्रामपंचायती या योजनेतून जोडण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील या कामासाठी सुमारे ३० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक असताना जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि अपुरा निधी यामुळे हे काम लांबणीवर पडले. त्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुक्यांमधील ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबल नेटवर्कने जोडल्या जाणार आहेत. या नेटवर्कमुळे ग्रामपंचायती थेट तहसील तसेच पंचायत समित्यांशी जोडल्या जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळू शकणार आहे. केंद्र शासनाची योजना असल्याने स्थानिक पातळीवर विरोध असला तरी ही योजना राबवण्यात येणार आहे. काम करताना अनेक ठिकाणी रस्ते खराब होत असल्याने स्थानिक पुढाऱ्यांचा विरोध होत आहे. यामुळे विरोध होत असलेल्या ठिकाणी कामाची गती संथ आहे.
