रत्नागिरी : प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा करुनही सोडवणूक झालेली नसल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रामसेवक युनियन शाखेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी पद रद्द करुन पंचायत विकास अधिकारी हे पद नेमून वेतन त्रुटी दूर कराव्यात. समान काम वेतन लागू करावे, ग्रामसेवक संवर्गास शासन निर्णयाप्रमाणे सुधारित प्रवासभत्ता दर महिन्याला पंधराशे रुपये मिळावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता पदवीधर करावी, २०११ च्या लोकसंख्येवर आधारित ग्रामविकास अधिकारी सजे व नेमणुका होणे आवश्यक आहे. २००५ नंतरचे ग्रामसेवक यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक वेतनवाढ देणे किंवा एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक नेमणूक करावी, ग्रामसेवक संवर्गातील अन्य यंत्रणांची कामे कमी करावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रलंबित मागण्या त्वरीत मान्य कराव्यात यासाठी राज्यस्तरावर सुरु असलेल्या आंदोलनात रत्नागिरीतील ग्रामसेवकांनी पाठींबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनिअनच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, कोकण विभागीय उपाध्यक्ष नारायण पवार, सरचिटणीस संजय दळवी, उपाध्यक्ष अजितकुमार खोत, कोषाध्यक्ष जी.डी. बडद, अर्जुन नागरगोजे, सुहास शिंदे, डी. एच. रोकडे, निधी जोशी उपस्थित होते. १६ ला विभागीय आयुक्त कार्यालय ठिकाणी धरणे, १८ ला पालकमंत्र्यांच्या घरी जाऊन निवेदन देणे, २४ ला मंत्र्यांच्या घरासमोर उपोषण, २१ ला मुख्यमंत्री व राज्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. सहा टण्यांमध्ये होणाऱ्या आंदोलनाला यश आले नाही, तर २२ ऑगस्टला जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
