नवी दिल्ली: भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. स्वातंत्र्य दिनी हे संगीत आनंदामध्ये अधिक रंग भरेल असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले. दूरदर्शनद्वारे तयार करण्यात आलेल्या या या व्हिडिओमध्ये भारतातील मुख्य ठिकाणांचे ‘स्नॅपशॉट्स’ तसेच गायक जावेद अली यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांमध्ये सरकारच्या कामगिरीचे वर्णन केले आहे. या देशभक्ती गाण्यासंदर्भात बोलताना जावडेकर म्हणाले, हा व्हिडिओ देशातील लोकांच्या भावना जागृत करेल. या अद्भुत प्रवासासाठी दुरदर्शन आणि प्रसार भारती टीमचे अभिनंदन यावेळी त्यांनी केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. जावडेकर म्हणाले, हे संगीत नविन भारताला समर्पित आहे. या व्हिडिओमध्ये चांद्रयान-2 चे प्रेक्षपण तसेच सरकारचे अनेक ऐतिहासिक उपक्रम दर्शवण्यात आले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले, हे गीत सशस्त्र सैन्याचे शौर्य आणि देशाच्या शहीदांना समर्पित आहे.
