पूरग्रस्तांसाठी रत्नागिरी पोलीस दल आणि सामाजिक संस्था देणार मदतीचा हात

0

रत्नागिरी : सांगली, कोल्हापूर येथे निसर्गाच्या प्रकोपाने प्रलयंकारी महापूर आला व कित्येक संसार उध्वस्त झाले. मनुष्य व गाईगुरांची जीवितहानी झाली. पूर ओसरल्यानंतर तेथे आता चिखल, गाई म्हशींचे मृतदेह, सडलेले धान्य, आणि दुर्गंधीचे साम्राज्य आहे. वीज व पाणी पुरवठा नाही, गॅस-सिलेंडर, स्वयंपाकाचे धान्य, भांडी-कुंडी पूरात वाहून गेली आहेत. थोडक्यात तेथील ग्रामस्थांचा संसार रस्त्यावर आला आहे. सरकार आपल्या पध्दतीने मदत कार्य करत आहेच, परंतु तिथे काम करणारी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा यांचेही संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना सुरुवातीचा मदतीचा हात समाजानेच पुढेकरणे गरजेचे आहे. पहिल्या टप्यात जिल्हाधिकारी रत्नागिरी व हेल्पिंग हँण्ड रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन्ही जिल्ह्यातील दुर्गम वस्ती वाडीतील चार गावांना कपडे, पाणी, धान्य, बिस्किटपुडे, फरसाण अशा वस्तूंचे प्रत्यक्ष बाधितांना वितरण करण्यात आले आहे. आताही बाधित माणसे त्यांच्या घरात जातील, साफसफाई करतील व मोडलेला संसार नव्याने सुरु करायचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना छोट्या छोट्या पण अत्यावश्यक गोष्टींची प्राथमिक मदत वेळीच होणे आवश्यक आहे. शासन प्रयत्न करत आहेच पण सामाजिक बांधिलकीपेक्षा माणुसकीच्या दृष्टीकोनातून खालील वस्तू प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन देण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी डॉ . प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पिंग हँण्ड रत्नागिरी अंतर्गतच्या जाणीव फाऊंडेशन, जनजागृतीसंघ, राजरत्न प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, स्वराज्य संस्था आणि अनुलोम यांनी संयुक्त विद्यमाने करण्याचे योजिले आहे.

मदतीसाठी कोणत्या वस्तू पाहिजेत

तांदूळ, मुगडाळ, सॅनेटरी नॅपकीन, अंगाचा व कपड्याचा साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, वह्या, पेन, डेटॉल लिक्वीड व खेळणी याच वस्तू आता गोळा करण्यात येणार आहेत

संकटकाळी समाजाच्या मदतीला धावून जाण्याचा रत्नागिरीचा इतिहास आहे. आज आपल्याच समाज बांधवांना धीर देण्याची व त्यांना परत उभे करण्याची वेळ आहे. प्रत्येकाला कितीही इच्छा असली तरी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन मदत करणे शक्य नसते. म्हणूनच रत्नागिरीकर आणि तेथील आपदग्रस्त नागरिक यांच्यातील दुवा बनण्याचा हा प्रयत्न !

तरी रत्नागिरीच्या सभ्य, सुसंस्कृत समाज, व्यापारी यांना आवाहन करण्यात येते की, आपण यथाशक्ती वरीलपैकी वस्तू दिनांक १७ व १८ ऑगस्ट २०१९ या कालावधीत सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत अंबर हॉल, टिआरपी व सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे जमा कराव्यात. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विविध भागात दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० ते दपारी १ या वेळेत पिकअप कॅन पाठविण्यात येणार आहे. तरी आपण देणार असलेल्या वस्तू स्वतंत्र्यपणे पॅक करुन स्वयंसेवकांच्या ताब्यात दयाव्यात. ज्यांना काही रक्कम द्यायची असले त्यांनी जाणीव फाऊंडेशन, रत्नागिरी यांच्या खालील खात्यावर जमा करावी आणि मोबाईल नं ९४२२००३१२८ या नंबर मेसेज किंवा व्हॉट्सअप करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

ज्यांना काही रक्कम द्यायची असले त्यांनी खालील खात्यात जमा करावी

नाव : जाणीव फाऊंडेशन , रत्नागिरी , बँकेचे नाव : जनता सहकारी बँक लि . पुणे शाखा : शिवाजीनगर , रत्नागिरी खाते क्र. ०२३२३०१००००१३५१, IFSC : JSBP0000023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here