रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांचे नुकसान झाल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरुवात करुन वादळामुळे झाडे पडून बंद पडलेले रस्ते झाडे बाजूला करुन पूर्ववत सुरु करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. निसर्ग चक्रीवादळामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील 1 हजार 976 गावांपैकी 1 हजार 53 गावातील वीजपुरवठा सुरु करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. जिल्ह्यातील 6 लाख 38 हजार 859 वीज ग्राहकांपैकी 4 लाख 25 हजार 305 वीज ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीतपणे मिळण्यास प्रारंभ झाला आहे. चक्रीवादळामुळे बंद पडलेले अति उच्च दाबाचे चारही उपकेंद्रे पूर्ववत सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील 32 उपकेंद्र बंद पडले होते. त्यापैकी 29 उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. नादुरुस्त झालेल्या 6 हजार 773 रोहित्रांपैकी 3 हजार 954 रोहित्रे दुरुस्त करण्यात आली असून ती पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत. उच्चदाबाचे 5 हजार 507 खांब पडले होते त्यापैकी 1 हजार 821 खांब नव्याने उभारण्यात आले आहेत. तर लघुदाबाचे 11 हजार 89 खांब चक्रीवादळामुळे पडले होते. त्यातील 1 हजार 887 खांब नव्याने उभारण्यात आले आहेत. बाधित 261 फिडरपैकी 215 फिडर पूर्ववत सुरु करण्यात यश मिळाले आहे. उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न अहोरात्र करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
