रत्नागिरी : सोशल मीडियाद्वारे महिलेशी ओळख वाढवून टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतात, अशी बतावणी करत ३० हजार ७२० रुपयांचा ऑनलाईन चुना लावणाऱ्या संशयिताच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फसवणुकीची ही घटना २० मार्च ते ३० मे २०२३ या कालावधीत घडली होती.
अनिल लक्ष्मण माने (३९, मूळ रा. नानेट, दापोली सध्या रा. गिरगाव, मुंबई) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर त्याचा साथिदार हिमांशू लक्ष्मणसिंग जैन (मूळ रा. राजस्थान, सध्या रा. बोरिवली, मुंबई) हा फरार आहे. याप्रकरणी गार्गी अपूर्व परुळेकर (२९, रा. वीर सावरकर पथ, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, संशयितांनी फिर्यादीशी व्हॉटसअॅप आणि टेलीग्राम अॅपवरून चॅट करून ओळख निर्माण केली. त्यानंतर माझ्याकडे एक टास्क आहे तो पूर्ण केला तर पैसे मिळतात. परंतु, प्रत्येक टास्कसाठी प्रथम काही रक्कम भरावी लागते, असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याचे नाव, बँक खाते नंबर, आयएफसी कोड अशी माहिती अज्ञात आरोपीला दिली. टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवॉर्ड मिळेल, असे सांगून सुरुवातीला फिर्यादीने भरलेल्या रकमेवर टास्क पूर्ण केल्यावर रिवॉर्ड व भरलेली रक्कम आरोपीने परत केली. मात्र, त्यानंतर फिर्यादींनी टास्कसाठी भरलेली ३० हजार ७२० रुपये रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 25/Aug/2023
