जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत स्वच्छता सर्वेक्षणाची मोहिम वर्षातुन दोन वेळा पावसाळयानंतर 2 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर व पावसाळयापूर्वी 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत घेण्यात येते. माहे एप्रिल 2013 पासुन ते माहे ऑक्टोबर 2017 पर्यंतच्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्हयामध्ये 845 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता सर्वेक्षणाची मोहिम राबविण्यात आली व आजपर्यंत राबविली जात आहे. स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेमध्ये एकाही ग्रामपंचायतींना आजपर्यंत लाल कार्ड मिळालेले नाही.
माहे एप्रिल 2013 पासुन ते माहे ऑक्टोबर 2017 पर्यंत जिल्हयामध्ये एकुण 845 पैकी 703 ग्रामपंचायतींनी सलग पाच वर्षे कोणत्याही प्रकारच्या जलजन्य साथीचा उद्रेक होऊ नये यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी व ग्रामपंचायतीमधील सर्व स्त्रोतांना सलग पाच वर्षे हिरवे कार्ड मिळवून देण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत असे दोन्ही निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना मा.ना.श्री.रविंद्रजी वायकर-पालकमंत्री, जिल्हा रत्नागिरी तथा राज्यमंत्री, गृहनिर्माण उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे व मा.श्रीम.स्वरुपा साळवी-अध्यक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या हस्ते समारंभपूर्वक चंदेरी कार्ड प्रमाणपत्रक व प्रशस्तीपत्रक प्रातिनिधिक स्वरुपात दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता पोलिस परेड मैदान, जेल रोड, रत्नागिरी येथे मंडणगड-निगडी, दापोली-जालगांव, खेड-कोतवली, गुहागर- आवरे-असोरे, चिपळुण- नारदखेरकी, संगमेश्वर- घोडवली, रत्नागिरी- नाखरे, लांजा- तळवडे व भडे, राजापूर- भालावली देण्यात आले.
ग्रामपंचायतींनी केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत ग्रामपंचायतमधील मा.सरपंच यांना चंदेरी कार्ड प्रमाणपत्र देऊन व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, जलसुरक्षक यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
चंदेरी कार्ड प्रमाणपत्रक व प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रमाला मा. जिल्हाधिकारी, जिल्हा रत्नागिरी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा रत्नागिरी, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद रत्नागिरी व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
