कर्नाटकसोबत तातडीने संयुक्त योजना तयार करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : कोल्हापूर, सांगली या भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत तातडीने मुख्यमंत्रीस्तरिय बैठक घेऊन विसर्ग कसा असावा, याबाबत संयुक्त करार करण्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून केली आहे. फडणवीस म्हणतात की, कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये गेल्यावर्षी आपण प्रचंड मोठ्या पुराच्या स्थितीचा सामना केला. मागील पुराच्यावेळी असे लक्षात आले की, आपल्या धरणाच्या विसर्गात विविध छोट्या-मोठ्या नद्यांचे पाणी येऊन मिळते आणि पुढे अलमट्टी धरणामुळे हे पाणी अडल्याने महाराष्ट्राची पाण्याची पातळी वाढून मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होते. अशावेळी अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढविणे, हाच पर्याय ठरतो. मात्र, अलमट्टीचा विसर्ग एका क्षमतेपेक्षा जास्त वाढविला की कर्नाटकमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविण्यास ते अनुकूल नसतात व त्यासाठी फार पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे कर्नाटक सरकारसोबत आताच संयुक्त योजना तयार करणे आवश्यक असून, त्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:34 PM 19-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here