मध्यप्रदेश मधील विदिशा जिल्ह्यातून १२ मार्च २०१९ रोजी बेपत्ता झालेल्या एका वृध्देला रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने केवळ पाच महिन्यात आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नातेवाईकांच्या ताब्यात देवून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाची पहाट आनंदाने साजरी केली. विस्मरण आणि भाषेच्या अडचणीमुळे ही महिला मध्यप्रदेश मधून २७ दिवसात संगमेश्वर येथे पोहचली होती. रतीबाई श्यामलाल साहू (६५) असे या महिलेचे नांव असून त्यांच्या मुलाने आज आपल्या आईला ताब्यात घेतले. त्यावेळी राजरत्न प्रतिष्ठानच्या सचिन शिंदेंसह सर्वांनाच अश्रू अनावर झाले.
रतीबाई श्यामलाल साहू या मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात असणाऱ्या कुरवाई तालुक्यातील बरेरवाडी गावच्या. वयोमानाप्रमाणे थोडे फार विस्मरण झाले असले तरी, त्या नातेवाईकांकडे जावून येवून होत्या. १२ मार्च रोजी त्या नातेवाईकांकडे जाते सांगून घराबाहेर पडल्या त्या परत आल्याच नाहीत. शोधाशोध केल्यानंतरही त्या न सापडल्याने त्यांचा मुलगा आसाराम याने पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची खबर दिली. रतीबाई चुकीच्या बस मध्ये बसल्या आणि अनोळखी ठिकाणी पोहचल्यामुळे गोंधळून गेल्या. अशातच घरी जायच्या ओढीने त्या मिळेल त्या बस मध्ये बसत गेल्या आणि मध्यप्रदेशची सीमा ओलांडल्यानंतर विस्मरण आणि भाषेच्या अडचणीमुळे त्या काय सांगतात हे कोणालाही कळत नव्हते. त्यांचा हा प्रवास सलग २७ दिवसांनंतर संगमेश्वर येथे येवून थांबला.
रात्रीची साडे अकराची वेळ, काळ्याकुट्ट अंधारात रस्त्याच्या मधून चालणारी स्त्री पाहून कोणाच्याही काळजात प्रथम भितीची छायाच उमटणार. मात्र सत्य उलगडायचा प्रयत्न केला की, वास्तव समोर येते. ८ एप्रिलच्या रात्री संगमेश्वर देवरुख मार्गावर अंदाजे ६५ वर्षांची वृध्दा मजल दरमजल करत पुढे जात होती. घागरा – चोळी, ओढणी असा वेश असल्याने सदर स्त्री राज्याबाहेरील वाटत होती. याच सुमारास बुरंबी येथील सामाजिक कार्यकर्ते पराग नाईक आपल्या दुचाकीने घराकडे निघाले होते. सदर महिला त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी काळजीपूर्वक निरिक्षण केले. काही वेळाने पत्रकार जे. डी. पराडकर हे देखील आपल्या घराकडे जाण्यासाठी आले असता. दोघांनी मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठान जवळ संपर्क केला. मनोरुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सचिन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदर महिलेला रत्नागिरी पर्यंत पोहचवा असे सांगितले.
पराग नाईक यांनी लगेचच १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन लावला. तोपर्यंत हाती वेळ असल्याने भुकेलेल्या वृध्देला जे. डी. पराडकर यांनी स्वतःच्या घरातून जेवण – पाणी आणून दिले. तिला हिंदी कळत असल्याने तिच्याजवळ बोलल्यानंतर ती पूर्ण मनोरुग्ण नसल्याची खात्री झाली. मात्र तीला पत्ता सांगता येत नव्हता. एवढ्यातच १०८ रुग्णवाहिका घेऊन चालक गणेश पाथरे आणि कर्तव्यतत्पर डॉ. लिंगायत दाखल झाले. महिलेसोबत पाण्याची बाटली देवून रुग्णवाहिका रत्नागिरीला गेली. तेथे राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते सेवेसाठी तत्पर होते. सदर महिलेच्या आंघोळीची व्यवस्था करत तिला चांगले कपडे देवून दुसऱ्या दिवशी न्यायालयाच्या निर्देशानुसार राजरत्नकडे तिचे पालकत्व देत मनोरुग्णालयात भरती करण्यात आले.
मनोरुग्णालयात डॉ. अमित लवेकर आणि रुग्णालयाचे सोशलवर्कर डॉ. शिवदे या महिलेच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून होते. याच दरम्यान मध्यप्रदेशातील अन्य एका मनोरुग्णा बाबत तिकडील पोलीस ठाण्यात राजरत्न प्रतिष्ठान चौकशी करीत असतांना त्यांना रतीबाई श्यामलाल साहू बेपत्ता असल्याचे समजले. त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क क्रमांक घेऊन सचिन शिंदे यांनी संपर्क केला. व्हिडिओ कॉलींगद्वारे या महिलेला दाखवताच त्यांची ओळख पटली आणि मुलगा आसाराम याने आपण रत्नागिरी येवून आईला घेऊन जावू असे सांगितले. गत चार महिन्यांच्या कालावधीत डॉ. अमित लवेकर आणि मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे रतीबाई पूर्ण बऱ्या झाल्या. आज स्वातंत्र्य दिनी सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन त्यांना जेंव्हा मुलगा आसाराम याच्या ताब्यात देण्यात आले त्यावेळी त्यांच्या गळाभेटीने उपस्थित सारेच भारावले.
