फायनान्स कंपनीतून बडतर्फ कर्मचाऱ्याकडून महिलेची १.१० लाखांची फसवणूक

0

रत्नागिरी : बजाज फायनान्स कंपनीतून बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने जुन्या महिला कस्टमरच्या आधारकार्डमध्ये फेरफार करून कंपनी आणि त्या महिलेची १ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना २० मे ते २ ऑगस्ट २०२३ या कालावधीत बजाज फायनान्स शाखा सांगली आणि रत्नागिरी येथे घडली आहे.

सुशांत अशोक कोडोलकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात राहुल बबन पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुशांत कोडोलकर हा राहुल पाटील यांच्या मजगाव रोड येथील बजाज फायनान्स शाखेत पूर्वी कामाला होता. त्याला कंपनीतून बडतर्फ करण्यात आले होते. त्याने कंपनीची जुनी कस्टमर श्रुतिका शिरगांवकर यांच्या आधारकार्ड वरील मूळ पत्त्यावरील जिल्हा व पिनकोड बदलून त्या ठिकाणी सांगली जिल्हा व पिनकोड नमूद केला. तसेच कस्टमर यांचा बंद मोबाईल नंबरचा वापर करून श्रुतिका यांच्या फोटोच्या जागी अनोळखी महिलेचा फोटो लावला. त्यानंतर कस्टमरच्या मोबाईल नंबरवर ओटीपी न पाठवता तो बायपास करून त्यावर आधारकार्डवरील जन्मतारीख टाकून आष्टा येथील एका कंपनीचा मोबाईल खरेदी करण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांचे लोन प्रकरण मंजूर करून घेतले. त्याचे २ हफ्ते श्रुतिका माजगावकर यांच्या बँक खात्यातून वजा झाले आहेत.

अशा प्रकारे संशयिताने कस्टमरच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून स्वतः चे आयडीवरून १ लाख १० हजार कर्ज घेऊन बजाज फायनान्स आणि श्रुतिका शिरगांवकर यांची फसवणूक केली. त्याच्या विरोधात भादवी कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here